| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटाराचे काम अपूर्णावस्थेत आहे. तसेच, या रस्त्याच्या साईडपट्ट्या व बाह्यवळण रस्त्याचे काम देखील अपूर्ण आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदार उड्डाण पुलाच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे आंबेवाडी बाजारपेठेतील अवस्था एक ना धड भराभर चिंध्या, अशी झाली असून त्यातून मार्ग काढतांना प्रवाशांची तारांबल उडत आहे. दरम्यान, हे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या 17 वर्षांत महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही, तो आता एका महिन्यात कसा पूर्ण होईल? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. तसेच, या अपूर्ण कामांमुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.







