| उरण | प्रतिनिधी |
एप्रिल महिन्यातच उन्हाने अक्षरशः थैमान घातल्याने उरण तालुक्यातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तापमानाने कडेलोट गाठल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात दुपारी बाहेर पडणे कठीण झाले असून, दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान रस्त्यांवर अक्षरशः 144 कलम लागू असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर उन्हाने पुन्हा आक्रमक रूप धारण करत वातावरणात मोठा बदल घडवला आहे. आबालवृद्धांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत असून, अंगाची काहिली वाढत चालली आहे. वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर पशु-पक्ष्यांनाही बसू लागला आहे. पाण्याच्या शोधात प्राणी-पक्षी पाणवठ्यांच्या आसपास घुटमळताना दिसत असून, निसर्गातील असंतुलनाचे हे जिवंत चित्र समोर येत आहे.







