। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने तेलंगण सरकारने राज्यात लागू केलेली टाळेबंदी रविवारपासून पूर्णपणे उठविण्याचा निर्णय घेतला असून शैक्षणिक संस्थाही 1 जुलैपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जवळपास महिनाभर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आणि सर्व विभागांच्या अधिकार्यांना सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून स्थिती नियंत्रणामध्ये असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. सर्व शैक्षणिक संस्था 1 जुलैपासून सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांना वर्गात हजर राहण्याची अनुमती द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची हजेरी, ऑनलाइन वर्ग यासह मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ती तातडीने प्रसृत करावी, असे मंत्रिमंडळाने सांगितले आहे.