आरोप-प्रत्यारोपात ‘विकासा’ ची हरवली चर्चा

| शिरूर | प्रतिनिधी |

शिरूर मतदारसंघात अर्जाची छाननी पूर्ण होऊन आता लढतीचे चित्र पूर्ण स्पष्ट झालेले आहे. राज्याच्या राजकारणातील बदलाचे वारे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावरही परिणाम करणारे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीचे आमदार असलेल्या या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्‍वासू असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचाराला निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरुवात केली होती.

निवडणुका आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हे यांना आव्हान देऊन या निवडणुकीत रंगत आणली होती, त्यातून कोल्हे यांच्या प्रचाराला जोर मिळाला. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र एकमेकांवरचा आरोपात आणि श्रेय वादात शिरूरच्या विकासाचे स्थानिक मुद्दे काहीसे मागे पडल्याचे चित्र सध्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यापैकी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले, तर आमदारांपैकी शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवार यांची साथ देणे पसंत केले. तरीसुद्धा अजित पवार यांनी स्वपक्षातील शिलेदारांऐवजी आढळराव पाटील यांना लोकसभा उमेदवारीची संधी दिली. जनसंपर्कावर हुकूमत असलेल्या आढळराव पाटील यांच्या बाजूने डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला जात आहे. त्याला संसदेतील शेतकर्‍यांसाठी, बैलगाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्या बाजूने प्रत्युत्तर दिले जात आहे. 25 लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

Exit mobile version