हरवलेली पाणपोई पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

एकता सामाजिक संस्थेचा पुढाकार

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल एसटी डेपो परिसरात प्रवाशांसाठी उभारलेली पाणपोई पत्र्याच्या शेडमागे लपल्याने दुर्लक्षित झाली होती. मात्र, एकता सामाजिक संस्थेच्या पुढाकारामुळे आता ही सुविधा पुन्हा प्रवाशांना सहज उपलब्ध झाली आहे.

पनवेल एसटी डेपोच्या पुनर्बांधणीचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. प्रवाशांना मोफत पाणी मिळावे यासाठी पटेल ज्वेलर्स यांच्या वतीने पाणपोई उभारण्यात आली होती. मात्र, विकासकाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमागे ही पाणपोई झाकली गेल्याने ती अनेक प्रवाशांच्या नजरेस पडत नव्हती. यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजून बाटली विकत घ्यावी लागत होती. ही बाब समोर आल्यानंतर स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत होती.

या समस्येकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेने तात्काळ पुढाकार घेतला. संस्थेचे अमोल शितोळे, अल्पेश माने, संतोष चिखलकर आणि गणेश शिंदे यांनी डेपो कर्मचारी प्रमोद देशमुख यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला. यानंतर पाणपोई सहज दिसेल अशा ठिकाणी मोठा दिशादर्शक फलक लावण्यात आला. त्यामुळे आता प्रवाशांना मोफत पाण्याची सुविधा सहजपणे मिळू लागली असून, त्यांच्या गैरसोयींमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचे प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधले जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Exit mobile version