वीसहून अधिक ठिकाणी होणार मिरवणुकांचा जल्लोष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
माघी गणेशोत्सव रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.22) ठिकठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने 21 हून अधिक ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये 465 ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये दिवसभर भजनांसह मिरवणुकांचा जल्लोष असणार आहे. माघी गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, हा उत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज आहेत.
जिल्ह्यामध्ये माघी गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात येतात. ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. अबालवृद्धांसह सर्वच या उत्सवात हिरीरीने सहभाग घेतात. यावर्षीदेखील हा उत्सव दि. 22 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी नऊ दिवस लवकर हा उत्सव आहे.
जिल्ह्यामध्ये श्रीगणेश जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.22) माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. अलिबागमधील कुलाबा किल्ल्यातील सिध्दीविनायक मंदिरासह पाली येथील बल्लाळेश्वर तसेच खालापूरमधील महड येथील गणरायाच्या मंदिरात तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरात गणेशमूर्तींची स्थापना करून धार्मिक विधी केली जाणार आहे. विधीवत पूजा केल्यानंतर मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले असणार आहे. काही ठिकाणी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. दिघीसागरी, महाड, नांदगाव, नागोठणे, तळवली, आंबेपूर, बोरघर, सातिर्डे, ताजपूर, फणसापूर, वळवली, भागवाडी, कुदे, शेतजूई अशा अनेक ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकांसमवेत कीर्तन, भजनांसह बेंजोचा नाद घुमणार आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानी देखील गावी दाखल झाले आहेत. नोकरी- व्यवयानिमित्त मुंबई व पुणे तसेच अन्य ठिकाणी असणारे चाकरमानी गावात आले असून, गावांतील माघी गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी करण्यास मग्न झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 465 ठिकाणी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. वीसहून अधिक ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी रायगड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकांच्यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे.







