। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार खुनी, अत्याचारी आणि शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला आहे.
नागपूरच्या रविभवन येथे रविवारी (दि.15) दुपारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला दानवे यांच्यासह शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आ. महेश सावंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, ज.मो. अभ्यंकर आदी उपस्थित होते. सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी, दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसाढवळ्या खून करणारे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला आहे. सोयाबीन, कापसाला भाव न देणारे, दुधाचे भाव घसरवणारे आणि शेतकर्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार आहे, असा जोरदार हल्ला त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका करत म्हणाले की, सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झालेले नाही, शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्येप्रकरणीही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. देशमुख यांची हत्या करून त्यांचे प्रेत नासवण्याचे काम हल्लेखोरांनी केले, मात्र अद्याप त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केलेली नाही, असा आरोप नाना पटोले महायुती सरकारवर केला आहे.
बेरोजगारांना विवस्त्र फिरण्याची वेळ
महाराष्ट्राची अधोगती झाली आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहे, उद्योगधंदे बाहेर पळाल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारांवर रस्त्यावर विवस्त्र फिरण्याची वेळ आली आहे. राज्यात गुंतवणूक येत नाही. गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राबाबत अनास्थ निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे पाठ थोपटण्याचे महायुती सरकारचे काम सुरू झाले आहे, अशी टीका काँग्रेस आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.
जनतेचे प्रश्न ताकदीने मांडणा
विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असली म्हणून काय झाले, महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या दोन्ही सभागृहांत ताकदीने आणि प्रभावीपणे मांडू, अशी ग्वाही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.







