टी-20 विश्‍वचषकाचा थरार सुरू

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अगामी टी-20 विश्‍वचषकाची मुख्य स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर टी-20 विश्‍वचषकाचे सराव सामने सुरू झाले आहेत. अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगोध्ये 27 मे ते 1 जून या कालावधीत सराव सामने खेळवले जाणार आहेत. विश्‍वचषकापूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत. सराव सामन्यांच्या पहिल्या दिवशी एकूण 3 सामने खेळले गेले. या सामन्यांमध्ये कॅनडा, ओमान आणि नामिबियाचे संघ विजयी झाले.

यावेळी सराव सामन्यांच्या पहिल्या दिवशी कॅनडाचा सामना नेपाळशी झाला. जो टेक्सासमधील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तर, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामना खेळला गेला. त्याचवेळी, दिवसाचा तिसरा सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये नामिबिया आणि युगांडा संघांमध्ये झाला. कॅनडाने नेपाळविरुद्धचा सामना एकतर्फी 63 धावांनी जिंकला. दुसरीकडे ओमानने पापुआ न्यू गिनीचा 3 गडी राखून पराभव केला. याशिवाय युगांडाला नामिबियाविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Exit mobile version