माणगावची वाट शिवभक्तांसाठी जीवनवाहिनी

ढालघर, निजामपूर मार्ग ठरतोय वरदान; छोट्या गावांमध्येही आर्थिक चैतन्य निर्माण

| माणगाव | प्रतिनिधी |

रायगड किल्ल्यावर शनिवारी (दि.6) छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी दरवर्षी लाखो शिवभक्त रायगडाच्या दिशेने निघतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांतून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून श्रद्धा, स्वाभिमान आणि इतिहासाची पवित्र भूमी आहे. अशा वेळी रायगडाकडे जाणारा माणगाव-ढालघर आणि निजामपूर मार्ग हजारो शिवभक्तांसाठी खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पारंपरिकरित्या महाड मार्गाचा वापर केला जात असला, तरी गेल्या काही वर्षांत माणगाव येथील ढालघर जोड रस्ता आणि निजामपूर मार्गे थेट रायगडाच्या पायथ्याशी पोहोचण्याचा पर्याय अधिक लोकप्रिय झाला आहे. या मार्गामुळे शिवभक्तांचे सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतर कमी होते. तसेच, प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत होते. परिणामी, मुंबई-पुण्यातून येणारे बहुसंख्य शिवभक्त महाड मार्ग टाळून माणगाव आणि निजामपूर मार्गाला प्राधान्य देत आहेत. राज्याभिषेक सोहळ्याच्या काळात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिसून येते. या मार्गावरून पहाटेपासूनच भगवे झेंडे फडकवत, शिवरायांच्या जयघोषात निघालेली वाहने माणगाव शहरातून रायगडाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. अनेक कुटुंबे, युवक मंडळे, शिवप्रेमी संघटना आणि दुर्गप्रेमी याच मार्गाने गडाच्या पायथ्याशी पोहोचतात. त्यामुळे माणगाव शहर हे राज्याभिषेक सोहळ्याच्या काळात शिवभक्तांच्या स्वागताचे प्रवेशद्वार बनते. स्थानिक नागरिकांच्या मते, ढालघर-निजामपूर मार्गामुळे केवळ वेळ आणि इंधनाची बचत होत नाही, तर प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षितही होतो.

रायगडाकडे जाणाऱ्या हजारो वाहनांमुळे या मार्गावरील छोट्या गावांमध्येही आर्थिक चैतन्य निर्माण होते. हॉटेल, भोजनालये, पेट्रोल पंप, किराणा दुकाने आणि स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळते. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने आरोग्य, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्थेची व्यापक तयारी केली असली, तरी या सर्व व्यवस्थेच्या यशामागे माणगाव-ढालघर-निजामपूर मार्गाची महत्त्वाची भूमिका आहे. कारण लाखो शिवभक्तांना रायगडाच्या चरणी पोहोचवण्याचे काम हा मार्ग शांतपणे आणि सातत्याने करत आहे.

इतिहासाशी जोडणारा भावनिक दुवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाकडे जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी हा मार्ग केवळ रस्ता नाही, तर इतिहासाशी जोडणारा भावनिक दुवा आहे. शिवरायांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी निघालेल्या प्रत्येक मावळ्याच्या प्रवासात माणगावची ही वाट आज अभिमानाने उभी आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर उमटणाऱ्या लाखो पावलांमध्ये या मार्गाचे योगदान तितकेच महत्त्वाचे आणि स्मरणीय ठरत आहे.
Exit mobile version