मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
| जालना | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडं निघाले आहेत. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आता 26 जानेवारीपासून नाही तर अंतरवली सराटीतून आजपासून आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आपण आहोत. त्यासंदर्भात समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी हा निर्णय घेणार आहे, असं म्हटलं आहे. आता समाजासाठी जीव अर्पण करायचा आहे. मराठ्यांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते भावूकही झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण 26 जानेवारीपासून करायचे होते. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केलाय. आता याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. आता आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही.
मराठा समाजानं सरकारला आरक्षणासाठी 7 महिने वेळ दिला होता. परंतु, आरक्षण मिळालं नाही. यामुळे आरक्षण घेण्यासाठी मुंबईत येणार आहोत. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून ही मुलं मुंबईला जात आहेत. आता मी असेल नसेल विचार जागे ठेवा, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकार आम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत. मी इथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो लोक असणार आहेत. आता आम्ही चारी बाजूनं लढणार आहोत. ही आरक्षणासाठी शेवटची लढाई आहे, असंही ते म्हणाले.
जशी जशी बावीस तारीख जवळ येत आहे, तसा तसा नव नवीन फंडा सरकार समोर आणत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा समाजानं सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला होता. सरकारच्या शिष्टमंडळानं आणि सरकारनं सात महिने काय केलं, असा प्रश्न जरांगे यांनी सरकारला विचारला आहे. तसंच ज्या ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकारनं आतापर्यंत का दिले नाही. राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तरी सरकारचे अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, फक्त वेळकाढूपणा सरकार करत आहे. मग सरकारला राज्यात अशांतता पसरवायची आहे का, असा सवाल त्यांनी केलाय.