| तळा | प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या लग्नसराईमुळे शहरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी दाखल झाले असून, या चाकरमान्यांमुळे तळा बाजारपेठ गजबजली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मे महिन्यात विवाह मुहूर्त असल्याने गावागावांत मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. तसेच हल्ली बंदिस्त हॉलमध्ये लग्न करण्यापेक्षा गावीच मोकळ्या जागेत आलिशान मंडप सजावट करून थाटामाटात लग्न करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, दिवा, नालासोपारा आदी ठिकाणी रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झालेले चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत. लग्न सोहळ्यासाठी मंडप, लायटिंग, स्पीकर, बाजा आदी साहित्य ठरविण्यासाठी यजमानी मंडळींची लगबग सुरु असल्याने नेहमी शुकशुकाट असलेली तळा बाजारपेठ सध्या गजबजलेल्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.







