आंबा-काजूनंतर आता खरीप हंगामही धोक्यात?; कृषी विभागाने दिला इशारा
| रायगड | प्रतिनिधी |
बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसलेल्या कोकणातील शेतकऱ्यांससमोर आता ‘एल निनो’ चे महाकाय संकट उभे राहत आहे. या नव्या संकटामुळे पावसात खंड पडल्यास, पावसावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील खरीप हंगामावर विपरित परिणाम होणार आहे. शासन, प्रशासन आणि कृषी विभाग या संभाव्य संकटाबाबत सतर्क झाले आहेत.
संकटाचा प्रभाव कमी करून शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल, यादृष्टीने आखणी केली जात आहे; परंतु ती पुरेशी आहे का? गावपातळीवर सभा घेऊन त्याची अंमलबजावणी होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय ‘एल निनो’चा प्रभाव खरिपासह रब्बी आणि पुढील वर्षीच्या आंबा-काजू हंगामावर कितपत होईल, याचा सखोल अभ्यास केला जात आहे.
कडाक्याची थंडी, धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम यांसारख्या प्रमुख फळपिकांना प्रचंड मोहोर आला. परंतु, थंडी आणि धुक्यामुळे 20 ते 30 टक्केदेखील फळधारणा झाली नाही. झालेल्या फळधारणेवर अवकाळी पावसाचा मारा झाला. काही ठिकाणी गारपीट, तर काही भागात वादळाचा तडाखा बसला. उरलेसुरले पीक तापमानवाढीने होरपळले. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात ‘जमाबाकी शून्य’ असेच चित्र कोकणात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यावर आता ‘एल निनो’चे संकट घोंघावू लागले आहे.
रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे. खरिपात भात, नाचणी, भाजीपाला अशी अनेक पिके घेतली जातात. येथील शेतकरी वर्षभरासाठी लागणारे भात उत्पादित करतो. स्वतःच्या कुटुंबाला पुरेसे धान्य ठेवून उर्वरित भाताची विक्री केली जाते. त्यामुळे भात हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, आर्थिक उलाढालीचेही माध्यम आहे. सध्या भाताला प्रतिक्विंटल 2, 369 रुपये दर मिळत आहे. जिल्ह्याच्या भात खरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
यंत्रणा सतर्क‘एल निनो’च्या संभाव्य धोक्यामुळे शेती व बागायतीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी शासन आणि कृषी विभाग सतर्क झाला आहे. जनजागृतीसाठी ग्रामपंचायतींमध्ये गावसभा घेण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या वाणांची निवड करावी आणि पाण्याचे नियोजन कसे करावे, याची माहिती देण्यात आली.
हवामानावर आधारित कृषी सल्ला आता ‘व्हॉईस’ स्वरुपात दिला जातो. किमान किती पाऊस पडेल आणि वातावरण कसे राहील, याची माहिती असते. शेतकऱ्यांनी या सल्ल्याचे अवलोकन करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अलीकडील काळात वरकस जमिनीत लागवडीचे प्रमाण वाढल्याने नदी-नाल्यांनजीकच्या जमिनी पडिक राहिल्या आहेत. जलस्रोत टिकून राहणाऱ्या जमिनींमध्ये पीक लागवड करण्याची गरज आहे, जेणेकरून गरज भासल्यास पाणी देता येईल.
शेतात पाणी टिकवण्यावर भर
पावसाचे पाणी शेतात न थांबता थेट नदी-नाल्यांमधून समुद्राला जाऊन मिळते. यावर्षी शेतकऱ्यांनी पाणी शेतातच मुरवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नांगरणी करताना आडवी नांगरणी करावी. समतल पातळीवर पेरणी करावी. बाष्पीभवन रोखण्यासाठी पालापाचोळ्याच्या जैविक आच्छादनाचा वापर करावा. डोंगराळ भागात समपातळीवर चर खोदावेत.
खरीप हंगामावर सावट
यंदाचे हे ‘एल निनो'चे वर्ष असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. ज्यावर्षी ‘एल निनो'चे सावट असते, त्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहते. रायगड हा भातपिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. पैकी 50 टक्के लागवड ही वरकस जमिनीत, अर्थात पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. काही क्षेत्रावर भातरोप पुनर्लागवड करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असते. जर तसा पाऊस झाला नाही, तर भात लागवड अडचणीत येण्याचा धोका असतो. यावर्षी ‘एल निनो'मुळे जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडण्याचा किंवा खंड पडण्याचा अंदाज आहे. 6 ते 20 जूनपर्यंत पेरण्या चालतात आणि लावणी 25 जून ते जुलै अखेरीपर्यंत चालते. त्यामुळे जुलैमध्ये पावसाने ओढ दिली, तर शेती संकटात सापडेल. पावसा अभावी वेळेत लागवड झाली नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
