राष्ट्रवादीत आता सामना रंगणार

वेगळे व्हायचे होते तर भांडी कशाला आदळता- सुरेश लाड

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काही आमदार बाहेर पडले आणि वेगळी चूल मांडून सत्तेत सहभागी झाले. हे मागील महिन्यातील घटना असली तर रायगड जिल्ह्यात वेगळी चूल मांडण्याची प्रथा यापूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालले होते याची कल्पना मला होती, असा हल्लाबोल माजी आ.सुरेश लाड यांनी कर्जत येथे रविवारी केला. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी आनंदाने वेगळे व्हावे पण भांडी आदळत आमच्यावर टीका करीत बाजूला जाण्याची गरज नव्हती, असा रोखठोक सवालही त्यांनी खा.सुनील तटकरे यांना अप्रत्यक्षपणे विचारला.

राज्य पातळीवर वेगळी चूल मांडली जात असताना आपल्या पक्षातील नेते त्यांना रसद पुरविणाऱ्या कार्यकर्त्यांना खतपाणी घालत होते. मी शांत होतो कारण जिल्ह्यात चाललेले राजकारण पाहत होतो आणि म्हणून शांत होतो.

सुरेश लाड, माजी आमदार

माझ्या खांद्यावर पक्षाने बंदूक दिली आहे, ती चालवावी तशी पक्ष संघटना सक्षम करून पक्षाचा झेंडा फडकवत ठेवणार.

सुरेश टोकरे, जिल्हाध्यक्ष

कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना सुरेश लाड यांनी रायगडात टोकरे यांच्या पाठीशी ठामपणे राहून जिल्हा पिंजून काढण्याचे काम शरद पवार, जयंत पाटील यांना शब्द दिला आहे, असे सुरेश लाड यांनी जाहीर केले. शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते किती आहेत हे पाहायचे होते म्हणून कोणालाही फोन केला नाही आणि ही गर्दी पाहून धन्य झालो, अशी प्रतिक्रिया देखील लाड यांनी व्यक्त केली.

आता शांत बसून राहण्याची वेळ नाही तर आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषदा तसेच ग्रामपंचायत यांच्या निवडणुका मित्र पक्षाच्या बरोबरीने 83 वर्षाच्या तरुण योध्याची राष्ट्रवादी काँग्रेस कशी आहे हे दाखवून देण्यासाठी कामाला लागायला हवे, असे आवाहन तानाजी चव्हाण यांनी केले. टोकरे यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version