| अलिबाग | प्रतिनिधी |
जे.एस. एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवासीय विशेष निवासी तथा श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सारळ या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबीर हे विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी जीवनाचे व व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्कृष्ट माध्यम आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील व उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांनी शिबिरार्थींना श्रमसंस्कार शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सारळ गावच्या माजी सरपंच ॲड. अमृता नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. निलम म्हात्रे, प्रा. अदिती दामले, सारळ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष मढवी, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश व शिबिरातील विविध उपक्रमांची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. अमृता नाईक यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा व समाजकार्यास हातभार लावावा.
प्राचार्या डॉ. सोनाली पाटील म्हणाल्या की, आजच्या या संगणकीय व तांत्रिक युगातून व मोबाईलच्या मोहपाशातून सुटका करून मेंदूला वेगळी चालना देण्यासाठी हे श्रमसंस्कार शिबीर एक उत्कृष्ट माध्यम आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.
सारळ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिबिरातील विविध उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व शिबिरासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.
श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वावलंबी जीवनाचा अर्थ: प्रा.डॉ. सोनाली पाटील
