चिरनेरमध्ये ‘हुतात्मे अमर रहे’च्या ललकारांनी जागा झाला शौर्याचा इतिहास
| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेरच्या भूमीत स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देणे होय. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीही तेजाने कायम तेवत राहतील, असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले.
उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी झालेल्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या 96व्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी शासकीय इतमामात अभिवादन सोहळा झाला. यावेळी गोगावले अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ब्रिटिश पोलिसांनी जंगल सत्याग्रहात सहभागी आंदोलकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी, आलू बेमट्या म्हात्रे, आनंदा माया पाटील, रामा बामा कोळी, रघुनाथ मोरेश्वर न्हावी, परशुराम रामा पाटील आणि हसुराम बुध्या पाटील या आठ शूर शेतकऱ्यांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी करण्यात येते. यावेळी गोगावले म्हणाले की, हुतात्म्यांच्या स्मृतिदिनाला मंत्री उपस्थित राहिले तर काही वेगळे घडते, असे मला समजले. मात्र, ज्यांनी मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिली, त्यांचे स्मरण करण्यासाठी आत्ताच नव्हे तर, यापुढेही येणार आहे. हुतात्मा स्मृतीदिनाचा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
नैना, एमएमआरडीएसारख्या विकास प्रकल्पांसाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा करत प्रश्न प्राधान्याने सोडवू, असेही त्यांनी सांगितले. आ. महेश बालदी यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, सरपंच भास्कर मोकल, पी.पी. खारपाटील, संतोष ठाकूर, तहसीलदार उद्धव कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामस्थ, हुतात्म्यांचे नातेवाईक व इतिहासप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे हुतात्मा स्मृतीस्तंभासमोर हवेत 21 फैरी झाडून व बिगुल वाजवून शासकीय मानवंदना देण्यात आली. मान्यवरांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. हुतात्मा चौकातील पूर्णाकृती शिल्पांनाही पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. यावेळी ‘हुतात्मे अमर रहे’च्या ललकारांनी चिरनेरची शौर्यभूमी दुमदुमून गेली. सरपंच भास्कर मोकल यांनी सेझबाधित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाव्यात, 35 सेक्शन व वन शिक्क्यांचे प्रश्न, वाहतूक कोंडी तसेच गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. तसेच अक्कादेवी येथील जंगल सत्याग्रहाच्या रणभूमीवरील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पूर्णाकृती स्मृतीस्तंभाला पेण, कर्जत, पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मानवंदना देऊन अभिवादन केले. सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.







