झेप च्या कार्यक्रमात स्मृतीगंधद्वारे आदरांजली
। आंंबेपूर । प्रतिनिधी ।
समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सुलभाकाकू पाटील पुरस्कार देऊन सन्मान करण्याची परंपरा झेप फौंडेशनने सुरु केलेली आहे. यावर्षीही हा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमात स्व.सुलभाकाकू पाटील यांच्या आठवणीने उपस्थित सारेच सद्गदीत झाले.
झेप फौंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सुलभाकाकू पाटील गुणगौरव पुरस्काराचे वितरण केले जाते. गेल्या वर्षापर्यंत सुलभाकाकू यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात साजरा होत असे. दुर्दैवाने गेल्या वर्षी काकूंचे निधन झाले आणि मंगळवारी महिना दिनी साजर्या झालेल्या झेपच्या कार्यक्रमात काकूंची उणीव उपस्थितांना तीव्रतेने जाणवली. प्रत्येक कार्यक्रमात काकू पांढरी शुभ्र काठा पदराची साडी परिधान करुन येणार्यांचे हसतमुखाने स्वागत करीत असतं. पुरस्कार प्राप्त महिलांना आशिर्वादही देत असतं. त्यांच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून उपस्थितही त्यांना भेटण्यासाठी आवर्जून भेट घेत असतं. एकूणच सारे वातावरण कौटुंबिक सोहळ्यासारखे असायचे. यंदा मात्र काकू नसल्याची जाणीव उपस्थितांना झाली आणि सार्यांचेच डोळे पाणावले. याच कार्यक्रमात स्मृतीगंध हा श्रद्धांजली पर कार्यक्रम घेऊन काकूंना उपस्थितांनी आदरांजलीही अर्पण केली. यावेळी 2000 महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख आशाताई शिंदे, माजी आ.पंडित पाटील, अर्बन बँक चेअरमन सुप्रिया पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जि.प.सभापती अॅड.निलिमा पाटील, जि.प.गटनेते अॅड.आस्वाद पाटील, सदस्या भावना पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर सदस्या रचना म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, नगरसेविका संजना किर, शिंदे मॅडम, अॅड. प्रसाद पाटील मान्यवर उपस्थित होते. झेपच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावर्षी अॅड. नीलिमा पाटील (राजकीय), डॉ कविता राणे(पत्रकारिता)भावेश्री वाळंज (शैक्षणिक), सुवर्णा वार्डे (उद्योजिका), स्मीता सहस्त्रबुद्धे (साहित्यिक), रिद्धी म्हात्रे वृत्तनिवेदिका यांना सुलभा पाटील महिला गुण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अर्चना राणे, निलिमा पाटील, स्मीता सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.