दुचाकीस्वार गंभीर जखमी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलजवळील कळंबोली परिसरात पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे आणि उघड्या अवस्थेतील चेंबर (मॅनहोल) नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. कळंबोलीतील एमजीएम रस्त्यावर एका मागोमाग दोन दुचाकी अपघात झाल्याने परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यातील खोल खड्डे आणि उघडे चेंबर वाहनचालकांच्या नजरेस पडत नव्हते. अशाच एका पाण्याखाली लपलेल्या चेंबरमध्ये दुचाकी घसरल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच ठिकाणी काही क्षणांतच आणखी एका दुचाकीस्वाराची गाडी खड्ड्यात आदळून तोही खाली पडला. सलग घडलेल्या या दोन अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, तरीही पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था जीवघेणी बनते. खड्डे, उघडी चेंबर्स आणि अपुरी देखभाल यामुळे रोजच अपघात होत असून सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातग्रस्त नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया देताना, एखाद्याचा जीव गेल्यावर किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अशी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला. स्थानिक नागरिकांनी कळंबोलीतील एमजीएम रस्त्यावरील धोकादायक खड्डे आणि उघडी चेंबर्स तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली असून, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
