। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तिन्ही ॠतू अतिशय तीव्र स्वरूपाचे अनुभवणाऱ्या पोलादपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून भरदिवसा देखील थंडीची लाट अनुभवण्यास मिळत आहे. शनिवारी (दि.13) सकाळी सव्वासात वाजेपर्यंत सूर्योदय झाला नसताना फक्त बारा अंश सेल्सियस एवढे न्यूनतम तापमान या ऍप्लिकेशनवर नोंदले गेल्याने फेब्रुवारी 2019मध्ये निर्माण झालेली थंडीची लाट यावर्षी डिसेंबर महिन्यातच अनुभवण्यास मिळत असल्याने पोलादपूरकर गारठले आहेत.
पोलादपूर तालुक्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत पावसाचा जोर दिसून आल्यामुळे यंदा पावसाळा येत्या मे महिन्यापर्यंत असल्याची धारणा पोलादपूरकरांमध्ये उपहासपूर्वक व्यक्त होत असताना अचानक थंडीने कहर करण्यास सुरूवात केली आहे. ऑक्टोबर हिटचा यंदा काही दिवस तडाखा बसला तरी पावसाने संततधार कायम ठेवली होती. शनिवारी सकाळी सव्वासात वाजता पोलादपूर तालुक्यात पारा खूपच खाली उतरल्याचे ऍक्युव्हेदर या मोबाईल ऍप्लीकेशनवरून दिसून आले. शनिवारी सूर्योदय पावणे आठ वाजेपर्यंत लांबणीवर गेला असताना वातावरणात कडाक्याची थंडी जाणवून तापमान केवळ 12 अंश सेल्सियस एवढे घसरले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हे तापमान 9 अंश सेल्सीयसपर्यंत होते असे काही पोलादपूरकरांचे म्हणणे आहे. धुके आणि गारव्यामुळे पोलादपूरकरांना दरवाजे खिडक्या बंद करून अंगात उष्णता निर्माण करणारे उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे. अनेकांनी रस्तोरस्ती शेकोट्या पेटवून चहाचे घोट घेत थंडीवर मात करण्याची उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.
पोलादपूरात पारा घसरला
