रायगड जिल्ह्याचा पारा चढला

। रायगड । खास प्रतिनिधी ।

ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने रायगड जिल्ह्याचा पारा चढला असतानाच आता आकाशातूनही सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांनी जिल्हा चांगलाच तापला आहे. मंगळवारी आणि बुधवारी मुंबईसह रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग शहरामध्ये तब्बल 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

पेणमध्ये 42 अंश सेल्सिअस, सुधागड-पालीत 41 अंश सेल्सिअस, कर्जत 40 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वातावरणात अचानक उकाडा वाढल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोपी, स्कार्फ, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत असल्याने घशाला लवकर कोरड पडत आहे. आपली तहान भागवण्यासाठी लिंबू सरबतासारखी थंड पेय मिळण्याला पसंती दिले जात आहे.

पुढील दोन दिवसांत राज्याच्या काही भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकणातील काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा शेती पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यामध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि पश्‍चिम मध्य प्रदेशमध्ये जोरदार वार्‍यासह पाऊस पडू शकतो. कर्नाटकातही 17 एप्रिलपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या उपाययोजना कराल
उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत, हलका आहार करवा, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. थंड पाण्याने आंघोळ करावी. घराबाहेरील उपक्रम/मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.
लक्षणे आढळल्यास काय कराल
डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा, त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजा, तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करावीत.
Exit mobile version