श्रीवर्धन आगाराचा भोंगळ कारभार

व्यवस्थापकांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

सातत्याने नफ्यात असलेल्या श्रीवर्धन एसटी आगारातील अनेक गाड्या भंगार अवस्थेत असून काही गळक्या तर अनेक गाड्या खाडखुड वाजत आहेत. श्रीवर्धन आगारातून मुंबईसारख्या नगरीत जाण्यासाठी अशा भंगार अवस्थेत आसलेल्या गाड्या चालवून एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी आणि आगार व्यवस्थापक प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.

श्रीवर्धन आगारातून प्रवासी वाहतूक करीत असलेल्या अनेक एसटी गाड्यांच्या टपावर प्लास्टिकचे आवरण टाकलेले आहे. तर, अनेक गाड्यांचे कॅरियर व खिडक्या निकामी झालेल्या आहेत. या गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धिम्या गतीने धावत असल्याने प्रवासी वर्गाचा पुरता खोळंबा होत आहे. याबाबत एसटी चालक व वाहक यांच्याकडे विचारणा केल्यावर गाडी जोरात पळविण्याचा प्रयत्न केला तर गाडी हेलकावे खाते. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असतानाही श्रीवर्धन एसटी आगार व्यवस्थापक प्रवाशांच्या जीवाशी खेळ का करित आहे, असा प्रश्‍न आ-वासून उभा आहे.
म्हसळा स्थानकातून सोमवारी (दि.23) सकाळी दहा वाजता सुटणारी श्रीवर्धन-दिघी तुरुंबाडीमार्गे मुंबईकडे जाणारी एसटी (एमएच-20-बीएल-1166) पुरती गळकी व भंगार अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. अशाच भंगार झालेल्या आणखी गळक्या गाड्या मुंबई फेरीसाठी वापरात आहेत. या गाडीमधुन वरिष्ठ अधिकारी आणि आगार व्यवस्थापक यांनी तिकीट काढून पाच ते सहा तास प्रवास करून बघावा आणि नंतरच जनतेच्या जीवाशी खेळ करावा, अशी रास्त अपेक्षा प्रवासी वर्गाने केली आहे.

श्रीवर्धन आगराच्या या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार भरतश गोगावले यांनी सातत्याने नफ्यात असलेल्या श्रीवर्धन आगराचा भोंगळ कारभारात लक्ष घालून सुधारणा करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.

Exit mobile version