विवाहित महिलेचा ऐवज लंपास

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील मुद्रे येथे राहणार्‍या एका महिलेला चार अनोखी महिलांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील पर्स आणि मोबाईल फोन लंपास करण्याची घटना घडली आहे. दिवसा शहरातील गर्दीच्या भागातून महिलेच्या जवळील पर्ससह मोबाईल हिसकावून घेतल्याने चोरट्यांची दहशत एवढी वाढली आहे, त्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणार्‍या स्वाती वनगे या शनिवारी (दि.13)दुपारी दोनच्या सुमारास ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तेथे चार अनोळखी महिला आल्या. त्या महिलांनी वनगे यांच्याशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. त्या चार महिलांनी वनगे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील पर्स सह 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेवून पळ काढला. त्या पर्समध्ये क्रेडिट कार्ड, रोख तीनशे रुपये तसेच काही ओळख पत्र होती.

याबाबत स्वाती वनगे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधीकचा तपास करत आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसून महिला देखील गुन्हे काम करण्यासाठी वेगवेगळ्या कृप्त्या आखत असल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version