मोदीच करणार तटकरेंचा पराभव

महायुतीची डोके दुखी वाढली ; मोदी फॅक्टर तटकरेंच्या विरोधात

| रायगड | आविष्कार देसाई |

लोकसभा निवडणूकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचे ढोल बडवून निवडणूक जिंकण्याची रणनिती आखण्यात आली आहे. मात्र, रायगड लोकसभा मतदार संघात मोदीच महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव करणार आहेत. मोदी फॅक्टर हा तटकरेंच्या विरोधात रणांगणात उतरल्याने त्यांची झोप उडाली असल्याचे चित्र आहे.

तुम्ही म्हणाल काय सांगता राव…. मोदींना तिसर्‍यांदा प्रधानमंत्री करुन हॅट्रीक साधायची आहे. यासाठी भाजपाने 400 पारचा नारा दिला आहे आणि मग तेच आपल्या उमेदवाराला निवडणूकीत कसे काय पाडतील. हे कसे काय शक्य आहे. तुमचा प्रश्‍न माझ्या लक्षात आला आहे. खरे तर मोदी काय आहे हे तुम्ही आधी समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. एम म्हणजे मराठा मतदार, ओ म्हणजे ओबीसी, डी म्हणजे दलित आणि आय म्हणजे इस्लामीक (इस्लाम मानणारे मुसलमान) असा त्याचा सरळ अर्थ आहे. हे सर्व घटक विरोधात एकवटले आहेत. त्याचा फटका हा सुनील तटकरे यांना बसणार असल्याचे दिसते.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मतदारसंघामध्ये मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतांचा चांगलाच प्रभाव आहे. 2014 च्या निवडणुकीत हे सर्व फॅक्टर तटकरेंच्या विरोधात गेल्याने तटकरेंचा पराभव झाला होता, तर 2019 च्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी हाच मोदी फॅक्टर तटकरेंच्या बाजूने उतरवल्याने तटकरे निवडून आले होते. मात्र, तटकरेंनी खासदार होऊन काय केले, असा सवाल मोदी फॅक्टरला पडला आहे. या समाजाला न्याय देण्यात तटकरेंना यश आलेले नाही. मराठा आरक्षणावरुन राज्यातील सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा, ओबीस समाज नाराज आहे. दलितांच्या प्रश्‍नांकडेदेखील तटकरेंनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही. भाजपाचे कर्नाटकातील खासदार अनंत हेगडे, राजस्थान-नागोर लाकेसभा उमेदावर ज्योती मिर्धा, उत्तर प्रदेशमधील खासदार लल्लू सिंह असे नेते खुलेआमपणे देशाचे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. एनआरसी, सीएए अशा विविध कायद्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये दहशत आहे. या समाजाच्या दफनभूमीचे प्रश्‍न सोडवण्यात तटकरे कमी पडल्याचा आरोप अलीकडेच करण्यात येत आहे. सध्या तटकरे हे धर्मांध पक्षासोबतच्या महायुतीत, म्हणजेच भाजपासोबत गेल्याने ही दहशत अजून वाढली आहे.

मोदी फॅक्टरमधील सर्व समाजात बेरोजगारीचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्प प्रलंबित आहेत. विविध प्रस्तावित धरणे प्रलंबित आहेत. अलिबागच्या रेल्वेचा प्रश्‍न, मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी, पाणीटंचाई असे विविध प्रश्‍न आ वासून उभे आहेत. त्यामुळे मोदी फॅक्टरमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. (दि.7) मे रोजी होणार्‍या निवडणुकीत तटकरेंना अस्मान दाखवण्याचा निर्धार मोदी फॅक्टरने केला आहे. त्यामुळे महायुतीला आतापासूनच हादरे बसू लागले आहेत, तर तटकरेंची डोकेदुखी वाढली आहे.

मोदी फॅक्टरमधील जातीय समीकरण
(रायगड लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार-16,53,935)
मराठा- 4,63,303 (20%)
ओबीसी-12,04,587 (52%)
दलित-3,93,806 (17%)
मुस्लिम-2,31,696 (10%)
Exit mobile version