पक्षीमित्रांनी दिले जीवदान
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दिवसेंदिवस उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा फटका पक्षी-प्राण्यांना बसत असून, पिण्याच्या पाण्याअभावी श्रीवर्धन शहरात एक वानर बेशुद्ध अवस्थेत गटारात पडलेले स्थानिकांना आढळून आले. केळस्कर पाखाडी येथील डॉ. प्रवीण बंदरकर यांच्या घरासमोरील गटारात झाडावरून काहीतरी खाली पडल्याचा आवाज येताच स्थानिकांनी गटाराजवळ जाऊन बघितले असता, बेशुद्ध अवस्थेतील वानर आढळले.
स्थानिकांनी त्वरित पक्षीमित्र बाळा वाणी, जीवन धंबा, सिद्धेश राऊत, अनिरुद्ध नागवेकर, प्रल्हाद परेकर व वनविभाग कार्यालयातील शैलेश केळस्कर यांना कळवताच बेशुद्ध अवस्थेतील वानरावर प्रथमोपचार करून श्रीवर्धन येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभाग कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत व कर्मचार्यांनी वानरावर उपचार करून झाल्यानंतर जंगलात सोडून दिले.