। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेमध्ये काम केलेले तीन तरुण राज्य सरकारच्या नवीन धोरणामुळे पालिका मुख्याधिकारी बनले आहेत. कर्जत तालुक्यातील स्थानिक दोन तरुण, तर नगरपरिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्षदेखील पालिका मुख्याधिकारी बनले आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील तरुण मनोज स्पष्टे यांनी कर्जत नगरपरिषदेमध्ये लेखापाल म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी मुरबाड नगरपंचायत, बदलापूर नगरपरिषदेमध्येदेखील काम केले होते. त्यांनी शासनाच्या नगरविकास विभागाने घेतलेल्या खात्यांतर्गत परिसंख्येत मुख्याधिकारी पदाची परीक्षा यशस्वी ठरले होते. त्यांना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंचर नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, तालुक्यातील वारे गावाचे रहिवासी असलेले मनोज म्हसे यांनी कर्जतनंतर बदलापूर नगरपरिषदेमध्ये काम केले आहे. बदलापूर नगरपरिषदेमध्ये कार्यरत असताना त्यांनी नगरविकास विभागाची परीक्षा दिली आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांच्यावर शासनाने जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. कर्जत नगरपरिषदेमधील पालिकेचे लेखापाल आणि नगरपरिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद नातू यांच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगरपरिषदेमध्ये पालिका मुख्याधिकारीपदाची जबाबदारी नगरविकास विभागाने दिली आहे.