15 दिवसांच्या हुलकावणीनंतर पुनरागमन
दुबार पेरणीचे काहीअंशी संकट टळले
पनवेल | वार्ताहर |
15 दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनने रायगडात बरसण्यास सुरुवात केली. जिल्हाभरात अनेक ठिकाणी बुधवारी (दि.7 जुलै) रात्रीपासून मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्या. हवामान खात्याने राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचा अंदाज वर्तविला असून, पुढील दोन मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, रिमझिम पावसाच्या सरींसह ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाल्याने आभाळाकडे डोळे लावून चातक पक्ष्यासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा मात्र सुखावला आहे.
यावर्षी दि.9 जून रोजी पनवेलमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही दिवस पावसाची संततधार पनवेल तालुक्यात सुरू होती, त्यामुळे बळीराजाची शेतीची कामे देखील योग्यरितीने सुरू झाली होती. परंतु, पनवेल तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन बहरात आलेली भातशेती संकटात सापडली होती. अखेर आज (गुरुवार, दि.8 जुलै) पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पनवेल तालुक्यात भातशेतीचे क्षेत्र 8150 हेक्टर असून, भाजीपाल्याचे क्षेत्र साधारण 325 हेक्टर आहे. तर काही प्रमाणात नाचणीचे पीक घेतले जाते. पनवेल तालुक्यात बहुतांश भाताचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने भातशेतीला आवश्यक असणारा पाऊस पडला नाही तर भाताचे पीक वाया जाते. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनमध्ये होरपळून निघालेल्या बळीराजाला दुबार पेरणीची शक्यता भेडसावत होती. पावसाच्या गैरहजेरीने सुरुवातीला पेरलेले बी अर्धवट जगलेल्या अवस्थेत असल्याने त्याखाली पावसाचे पाणीच उरले नव्हते. त्यामुळे पिकाला ओलावा राहिला नसून ते सुकून जाण्याच्या अवस्थेत होते. पेरणीसाठी व लावणीसाठी आवश्यक असणारा पाऊस नसल्यामुळे उन्हात पिके करपत चालली होती. तसेच बोअरवेलच्या माध्यमातून देखील मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. परंतु बुधवारी रात्रीपासून वरूणराजाच्या कृपादृष्टीने पावसाच्या सरी सुरू झाल्याने शेतरकर्यांमध्येही आता चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाच्या पुनरागमनामुळे दुबार पेरणीचे संकट टळलेले आहे. गुरुवारी बर्यापैकी पाऊस पडला असला तरीही शेतीसाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष लावणीसाठी पावसाचे पाणी शेतात साचून राहणे अत्यंत गरजेचे आहे.
ईश्वर चौधरी, पनवेल तालुका कृषी अधिकारी