। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊससमोर मोटारीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत स्वाराच्या पाठीमागे बसलेल्या आईचा मृत्यू झाला असून, स्वार गंभीर जखमी झाला आहे. सविता सखाराम पुजारी (52) असे मृत महिलेचे नाव असून ,दुचाकीस्वाराचे नाव सुहास सखाराम पुजारी (25) असे आहे.
त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
सुहास पुजारी हा दुचाकीवर (एमएच-08-एव्ही-8697) आई सविता हिला घेवून नेरकेवाडीकडून राजापूरकडे येत होता. दुचाकी नेरकेवाडी येथील कोळेकर फार्मजवळ आली असता मुंबईकडून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणार्या मोटारीने (एम-06-एएस-7629) सुहासच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात सुहास व त्याची आई गंभीर जखमी झाली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर जगद्गुरू महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक समीर हळदणकर यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचत जखमींना रुग्णवाहिकेने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
मात्र, या उपचारापूर्वी सविता पुजारी यांचे निधन झाले होते. तर सुहास याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.