। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्याचा विकास केवळ मा. आ. विवेक पाटील यांनीच केला आहे. नंतरच्या काळात आलेल्या आमदारांनी येथील लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांना कोणत्या सोयी सुविधा हव्यात, याकडे दुर्लक्ष केले आहे. मा. आ. विवेक पाटील यांच्या पराभवाचा वचपा शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून आणून काढू, असा विश्वास उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांत पाटील यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उरण येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या नुसत्या घोषणाच झाल्या असून प्रत्यक्षात कागदावरच मंजुरी मिळालेली आहे. उरण मतदारसंघातील उरणसह पनवेल, खालापूर, चाणजे, करंजा, केगाव, घारापुरी आणि पूर्व भागातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथे औद्योगीकरण झाले असले तरी बेरोजगाराची संख्या वाढत चालली आहे. तसेच, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह मोरा बंदरातील गाळाची समस्या कायमची डोकेदुखी ठरत आहे. सिडको, जेएनपीए प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना साडेबारा टक्के भूखंड वाटप आणि इतर प्रश्न सुटलेले नाहीत. नैनासह अलिबाग-विरार कॉरिडोर, तिसरी मुंबई या प्रकल्पात शेतकर्यांना मोबदल्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विद्यमान आमदारांनी विकास करण्या ऐवजी भकास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, नोकरभरती आणि इतर समस्यांचा सामना आजही करावा लागत आहे.
आता उरण मतदार संघाला स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करणारा आमदार हवा आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांच्यासारख्या चळवळीच्या उमेदवारला येथील लोकांची पसंती आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांनी घेतलेल्या सभांमधून त्यांनी लोकांशी साधलेला संवाद त्यांना विजयी करण्याचे काम करेल, असा विश्वासही रमाकांत पाटील यांनी व्यक्त केला.