। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
पेण-सुधागड-रोहा विधानसभा शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांची प्रचार रॅली शनिवारी (दि.16) पालीतील श्री गणपती मंदिर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुरेश खैरे यांनी केले. यावेळी उमेदवार अतुल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.
या रॅलीत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅली दरम्यान पाली शहरात लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, अतुल दादा आगे बडो हम तुम्हारे साथ हे, अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी पाली परीसर दणाणून सोडला होता. या रॅलीचे अभूतपूर्व स्वरूप बघून विरोधकांना घाम फुटला असेल. तसेच, शेतकरी कामगार पक्षाची तालुक्यात ताकद काय आहे ही 20 नोव्हेंबर रोजी होणार्या मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानातून दाखवून द्यायची आहे. सुधागड तालुक्याच्या विकासात शेकापचे योगदान खूप आहे. यापुढे ही तालुक्याचा विकास करण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा आमदार अतुल म्हात्रे यांना बहुमताने निवडून अणायचे आहे, असे आवाहन शेकाप नेते सुरेश खैरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी, अतुल म्हात्रे यांनी उपस्थित समुदायाला संबोधित करताना म्हणाले की, सुधागड तालुक्यातील तरुण रोजगारानिमित्त मुंबई, पुणे, ठाणे येथे जातो. मात्र, या तरुणांना तालुक्यात रोजगार निर्माण करण्याच्या अनेक संधी आहेत. सुधागड हा पर्यटन तालुका आहे. पर्यटनावर आधारित पर्यावरण पूरक अनेक व्यवसाय निर्माण करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असेन, असे त्यांनी सांगितले.