पेण तालुक्यातील कोट्यवधींच्या खारबंदिस्तीचा फज्जा

ठेकेदारांना नोटिसा, अधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील कोपर दुतर्फा खारभूमी (खारबंदिस्ती) योजनेसाठी शासनाने मंजूर केलेल्या 6 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या खारबंदिस्तीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत पहिल्याच पुरात खारबंदिस्तीची दुरवस्था झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी ठेकेदारांसह कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कामाचा ठेका श्री स्वामी समर्थ, पुणे या संस्थेला देण्यात आला होता. त्यानंतर हे काम सब-ठेकेदारांकडे सोपविण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामध्ये संतोष बुरूडे, बबन, गुलाबचंद आणि नवनाथ यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या खारबंदिस्तीचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार 12 मीटर रुंदी, 4 मीटर उंची, 3 मीटर माथा, दुतर्फा पिचिंग, एक फूट मुरूमाचा थर आणि तीन उघाडे अशा स्वरूपात होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात काम मंजूर आराखड्यापेक्षा कमी मापात व निकृष्ट दर्जाने करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपेक्षित रुंदी, उंची आणि माथ्याच्या मापात मोठी तफावत आहे. तसेच मुरूमाचा आवश्यक थर अनेक ठिकाणी न दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तीन उघाड्यांची मापेही अंदाजपत्रकाप्रमाणे नसल्याने पुराचे पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहून जाऊ शकले नाही आणि हमरापूर परिसरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कामाची प्रत्यक्ष मोजणी झाली होती का, गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती का, तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्याचा आरोप असताना ठेकेदारांची बिले कशाच्या आधारे अदा करण्यात आली, असे सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, खारभूमी अभिलेख विभागाच्या उपअभियंता नैना सुनकड यांनी कोपर खारबंदिस्तीची पाहणी केली असून संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, केवळ नोटिसा बजावून प्रकरण संपणार नाही, तर स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत प्रत्यक्ष मोजमाप, गुणवत्ता तपासणी आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Exit mobile version