मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवासासाठी असुरक्षितच

वर्षभरात 342 अपघातांची नोंद; महामार्गावर गतिरोधकांची संख्या अधिक

| महाड | उदय सावंत |

देशात आणि राज्यात अनेक प्रकल्प पूर्ण झाले तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच काँक्रिट रस्त्याच्या गुणवत्तेचे तीनतेरा वाजल्याने आजही हा महामार्ग प्रवासाच्या दृष्टीने असुरक्षितच आहे. सन 2025 या सरत्या वर्षात जवळपास 342 अपघातांची नोंद झाली असून, या अपघातांमध्ये नोव्हेंबरपर्यंत 110 जण मृत्युमुखी पडले आहेत. ही सरकारी आकडेवारी असून, यातील अनेक अपघात हे दोघांच्या समजुतीमध्ये नोंद झालेले नाहीत, यामुळे अपघाताची आकडेवारी सरकारी दफ्तरी नोंदीपेक्षा अधिक आहे. डिसेंबर अंतिमपर्यंत ही आकडेवारी जवळपास 500 हून अधिक झालेली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली दोन दशके सुरूच असल्याने जगातील आश्चर्यांमध्ये गणना करावी लागणार आहे. संताप यावा असे काम शासनाकडून सुरु असले तरी कोकणवासीय आणि कोकणातील नेते खूपच संयमी राहिले आहेत. यामुळे कोकणवासीय गेली पंधरा वर्षे अपघात, खड्डेमय रस्त्यांचा प्रवास आणि ऐन गणेशोत्सवात पर्यायी मार्ग शोधण्यात मनस्ताप सहन करत आले आहेत. मात्र, शासनाच्या म्हणण्यानुसार महामार्ग पूर्णत्वास आला असला तरी वाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महामार्ग आजही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

या महामार्गाने अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. मात्र, आजही या स्थिती बदल झालेला नाही. महामार्गावर अपघातांची संख्या आजही कायम आहे. पनवेल-पळस्पे येथून या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला, तर दुसरा टप्पा इंदापूर ते कशेडी, पुढे कशेडी ते सावंतवाडी दरम्यान हे काम गेली दोन दशकांपासून सुरूच आहे. तांत्रिक अडचणी न सोडवता कामाला सुरुवात झाली आणि जागोजागी अडथळे येत राहिले. आजही हे अडथळे दूर करण्यात शासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही. ज्यावेळेस या महामार्गाचे सर्व्हेक्षण झाले, त्यावेळीच या बाबी लक्षात का आल्या नाहीत, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. या चुकीच्या नियोजनाचा फटका मात्र कोकणवासियांना बसत आहे. कोकण वगळता अन्य भागातील महामार्ग वेळेत पूर्ण करण्याकडे शासनाने लक्ष केंद्रित केल्याने या महामार्गाचे काम आजही अपूर्ण आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासी यांना खुश करण्यासाठी महामार्गाच्या कामाचे आणि दौरे करून मंत्री हात वर करताना दिसतात.

पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यात आले आहे. हे संपूर्ण काम काँक्रिटमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि दशकापासून हे काम आजही सुरूच आहे. पळस्पे फाट्यापासून इंदापूरपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम डांबरीकरणांमध्ये झाले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे काँक्रिटमध्ये सुरू करण्यात आले. आजही नागोठणे, कोलाड पुढे इंदापूर, माणगावपर्यंत रस्त्याचे काम अपूर्णच आहे. काँक्रिट काम समतल नसल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्यातील पूल आणि छोट्या मोऱ्यांवरील कामदेखील मूळ रस्त्याला समतल पातळीत नसल्याने वाहने आदळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत, तर अनेक ठिकाणी खड्डेदेखील पडू लागले आहेत. यामुळे अल्पावधीतच अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले आहे.

पळस्पेपासून पोलादपूरपर्यंत अनेक ठिकाणी निराकार गतिरोधक उभे केले आहेत. महामार्गाला गतिरोधक टाकल्यामुळे वेगात असलेली वाहने या गतिरोधकांवर आदळू लागली आहेत. वाहनांचा खालील भाग या गतिरोधकांना लागत असल्याने वाहनांचे देखील नुकसान होत आहे. त्यातच कर्नाळा आणि खिंडीत रंबलिंग पद्धतीचे गतिरोधक टाकले आहेत. उतारावर या गतिरोधकांवरून वाहने घसरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. असमतोल रस्त्यामुळे अनेक ठिकाणी डांबर टाकून रस्ता समतल करण्याची नामुष्की महामार्ग विभागावर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या या निकृष्ट कामामुळे वाहनांचे अपघात मात्र कायम राहिले आहेत. महामार्गाच्या मध्यभागी वृक्ष लागवड करणे आवश्यक असतानादेखील आजही हे वृक्षारोपण न झाल्याने वाहनांच्या प्रखर दिव्यांनी वाहनचालकांना त्रास होत आहे.

या महामार्गावर असलेल्या धोकादायक स्थळांची पाहणी एका तरुणाने करून याबाबतची माहितीदेखील नितीन गडकरी यांना पाठवली आहे. या महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी धोकादायक स्पॉट, असमतल रस्ता, अचानक आणि नियमबाह्य देण्यात आलेले देण्यात आलेले पर्यायी मार्ग, असुरक्षित गतिरोधक यामुळे महामार्गाचा प्रवास आजही धोकादायकच आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, असमतल रस्त्याऐवजी संपूर्णपणे डांबरीकरणच करावे, अशी मागणीदेखील होत आहे.

Exit mobile version