| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.14) पनवेल ते झाराप अशी एकदिवसीय वर्षा सहल केली. यावेळी त्यांनी मागील वर्षी पाहिलेल्या खड्ड्यांची पुन्हा पाहणी केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला आहे. चव्हाण यांनी आतापर्यंत जवळपास तीन ते चार वेळा महामार्गाची पाहणी करत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुझवले जातील असे आश्वासन देखील दिले होते. मात्र भरलेले खड्डे पुन्हा वर येत असल्यान त्यांनी यावर काहीच भाष्य न करता फक्त पाहणीसोबत फोटोसेशन करुन घेतले.
कोकणातील गणेशोत्सव हा महत्वाचा सण आहे. विविध ठिकाणी असणारे कोकणस्थ आवर्जुन आपल्या गावी गणेशोत्सवला हजेरी लावतात. हा गणेशोत्सव महिनाभरावर येवून ठेपला आहे. चाकरमण्यांना गणेशोत्सवाकरीता गावी येताना गेली अनेक महामार्गाच्या खड्डयांचा सामना करत यावे लागत आहे. यावर्षी देखील खड्डयांचे हे विघ्न सुटले नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. महामार्गाचे रूंदीकरण आधीच रखडले गेले आहे. त्यातच जुन्या आणि नव्याने होत असलेल्या रस्त्याचे वाटोळे लागले आहे. रामवाडी ते वडखळ यामध्ये पडलेल्या खड्डयांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने प्रवाशांना हा प्रवासाकरीता एक तास लागत आहे. मुंबई ते महाड हा प्रवास किमान सहा तासांचा झाला आहे. ऐन गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूक कोंडीमुळे हे तास वाढण्याची शक्यता आहे.
महामार्गाचे अपुरे काम
मुंबई गोवा महामार्गाचे काम सन 2014 पासून सुरु करण्यात आले आहे. या कामाला आतापर्यंत जवळपास आठ वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्ग परिपूर्ण झालेला नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार आणि ठेकेदार कंपन्यांना पाठबळ यामुळे नियमांचे उल्लंघन करत गेली आठ वर्ष सुरु असलेले हे काम आजदेखील पूर्णत्वास आलेले नाही. पुढील कांही महिन्यात महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल असा दावा महामार्ग अधिकारी करत आहेत. मात्र महाड सह संपूर्ण कोकणातील भौगोलिक स्थिती पाहता महामार्गाचे काम पुढील वर्षभर तरी पूर्णत्वास येण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप भूसंपादन प्रक्रिया रखडलेली असल्याने काम ठप्प आहे. तर अनेक ठिकाणी मातीची कमतरता, कामामधील नियोजनाचा अभाव यामुळे महामार्गाचे काम रडतखडत सुरु आहे. पनवेल ते इंदापूर यादरम्यान असलेले डांबरीकरण पूर्णत खराब झाले आहे. यामुळे हा पहिला टप्पा पुन्हा काँक्रीटच्या माध्यामतून केला जाणार आहे.
डझनभर मंत्र्यांकडून पाहणी
पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे पूर्णत वाटोळे लागले आहे. आतापर्यंत डझनभर मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील मंत्र्यांनी देखील ऐन गणेशोत्सवापूर्वी पाहणी करून कोकणवासीयांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
महामार्ग विविध तांत्रिक कारणामुळे रखडला होता मात्र या समस्या सोडवत आता हा मार्ग पूर्ण करण्याकडे शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण केली जाईल.
रवींद्र चव्हाण, बांधकाम मंत्री