बॅनर हटवण्यास महापालिकेची सुरुवात

दोन दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याकडे कल

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता झाल्यापासून 72 तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत शहर फलकमुक्त करण्याचे लक्ष्य कर्मचार्‍यांनी ठेवले आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणार्‍या इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून फलकबाजीतून शहर विद्रुप करुन ठेवले होते. आघाडी, युती, महाआघाडी अशा सर्वच राजकीय आघाड्यांवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरात पक्षीय मेळावे, सभांच्या आयोजनातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात झाली होती. त्याचबरोबर फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातून फुकटी फलकबाजी बोकाळत असून शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र होते. परंतु आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहर फलकमुक्त करावे लागणार आहे. नवी मुंबई शहरात चौकाचौकांत फुकट्या बॅनरबाजीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. पालिकेच्या सर्वच विभागातील चौकांचे त्यामुळे विद्रुपीकरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पामबीच मार्गावरही मोठ्या प्रमाणात फलकबाजी पाहायला मिळत होती. फलक लावताना नियमावली असून फलकाच्या आकारानुसार दरआकारणी होणे गरजेचे आहे. परंतू असे होताना दिसत नाही. तसेच पालिका विभाग अधिकारी कार्यालयाअंतर्गत व महापालिका अतिक्रमण विभागामार्फत अशा फुकट्या फलकबाजीवर कारवाई होताना दिसत नव्हती. आता सर्वच फलक हटवावे लागणार आहेत.

Exit mobile version