जुने भाजीमार्केट पालिकेने पाडले

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

शहरातील धोकादायक बनलेल्या मच्छीमार्केट येथील जुनी भाजीमार्केटची इमारत पालिका प्रशासनाच्या पथकाने पाडली आहे. या भाजीमार्केट इमारतीच्या ठिकाणी पालिकेच्या मालकीची 3 कोटी रुपये खर्च करून नवी भाजीमार्केटची इमारत उभारली जाणार आहे.

बाजारपेठेतील जुन्या भाजीमार्केटची इमारत 1975 ची असून, ती पूर्णपणे मोडकळीस आली होती. त्यामुळे रत्नागिरी पालिकेने येथील गाळेधारकांना मार्केट मोकळे करून देण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली; परंतु गाळेधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पावसाळ्यात या इमारतीजवळ मोठा नोटीस बोर्ड लावून या मार्केटमध्ये येणार्‍या-जाणार्‍यांना धोकादायक इमारतीसंदर्भात सूचित करण्यात आले; परंतु याकडेही गाळेधारकांनी दुर्लक्ष केले. गाळेधारकांना पुन्हा नोटीस देऊन मार्केटमधील गाळे मोकळे करून देण्यास सांगितले. या नोटीसविरुद्ध शंकर पोतदार, दत्ता कनगुटकर, राजाराम पवार या तीन गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली.

योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याखेरीज भाजीमार्केट इमारतीतील दुकान गाळ्यांचा कब्जा रत्नागिरी पालिकेने घेऊ नये किंवा इमारत पाडू नये यासाठी आदेश करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली; परंतु न्यायालयाने कोणतीही स्थगिती न दिल्याने शुक्रवारी पालिकेच्या पथकाने मोडकळीस आलेली ही इमारत जेसीबी लावून पाडण्यास आली तेव्हा गाळेधारकांनी भाजीसह आपल्या वस्तू हलविल्या. त्यामुळे पथकाने जेसीबी आणि कामगारांच्या मदतीने इमारत पाडण्यास सुरू केले.

Exit mobile version