| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या विविध ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. या बांधकामांमुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हवा प्रदूषण पातळी कमी करण्याबाबत महाराष्ट्र शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या 15 प्रकारच्या मार्गदर्शक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या आणि बांधकामाच्या ठिकाणी सेन्सॉर आधारित वायु प्रदूषण मॉनिटर स्थापित न लावणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 52 विकासकांना काम बंदची नोटिस बजावण्यात आली आहे. त्यात कळंबोलीतील 9, कामोठ्यातील 10, नवीन पनवेलमधील 28 आणि पनवेलमधील 5 प्रभाग निहाय नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी दिली आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेचे निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याचा फायदा घेऊन अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तसेच, महानगरपालिका डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनाधिकृत बांधकामांना आळा घालवा, जेणेकरून हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. अशा आशयाचे पत्र सुनील शिरीषकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिले आहे.







