फेरीवाल्यांच्या विरोधातील मनपाची कारवाई थंडावली

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, खांदाकॉलोनी आदी भागात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा फेरीवाल्याच्या गाड्यांमध्ये वाढ झाली असून, या वाढत्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यातून चालणे जिकरीचे बनले आहे. तसेच, वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

झपाट्याने विकसित होत असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रमुख मार्ग, तसेच पदपथांवर सध्या बेकायदा फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. शहरातील अनके सेक्टर मध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. तसेच, रस्ते आणि पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सिडकोने सेक्टर निहाय राखून ठेवलेले भूखंड भाजी मार्केटसाठी द्यावेत, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याच प्रमाणे महानगरपालिकेने सुद्धा भाजी मार्केट साठी राखीव भूखंड ठेवावे हि मागणी सुद्धा होते आहे. असे असले तरी आगामी सणांच्या पार्श्ववभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी ये-जा करीत असतात, परंतु वाहतूक कोंडीमुळे वाद विवाद होण्याचे प्रकार सुद्धा वाढले आहेत. पनवेल महानगरपालिकेची अतिक्रमण मोहीम सुद्धा गेल्या काही दिवसांपासून थंडावल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेत.

Exit mobile version