| पेण | प्रतिनिधी |
शासनाने 5 दिवसाचा आठवडा करुनदेखील कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा करण्याच्या सवयी जात नाहीत हेच खरं. गेल्या महिन्यात देखील कृषीवलने पेण पंचायत समितीचा पोलखोल केला होता. त्यानंतर बरेच दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग पेण यांच्या तक्रारी कृषीवलच्या प्रतिनिधीकडे येत होत्या. त्यामुळे सोमवारी (दि.30) सकाळी 9:30 च्या सुमारास प्रतिनिधींनी सार्वजिनक बांधकाम विभाग गाठले. त्यावेळी कार्यालयातील सत्यता समोर आली. कार्यालयात काम करणाऱ्या एकूण तेरा कर्मचाऱ्यांपैकी फक्त तीनच कर्मचारी हजर असल्याचे निदर्शनास आले.
कार्यालयात कनिष्ठ लिपीक भास्कर सुतक, शिपाई सागर घाटकर आणि सोनावणे हे कर्मचारी हजर होते. त्यानंतर गणेश जाधव हे साधारणतः 9:55 ला आले. त्यानंतर सव्वा दहा वाजले तरी कुणीही कर्मचारी अथवा अधिकारी कार्यालयात पोहचले नव्हते. याबाबत कनिष्ठ लिपीकांकडून माहिती घेतली असता बरेचसे कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याचे समोर आले. अखेर आमच्या प्रतिनिधींनी डी.एम. पाटील, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग पेण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पाच ते दहा मिनिटामध्ये कार्यालयात पोहोचतो. त्याप्रमाणे ते कार्यालयात आले. सर्व कार्यालयाच्या भयाण स्थितीबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, योग्य उत्तरे मिळाली नाहीत.
कार्यालयाचे वाहन रात्रीच्यावेळी कामाव्यतिरिक्त फिरताना दिसते. तसेच विश्रांतीगृहाच्या चार खोल्या गोडाउन म्हणून वापरल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना विश्रांतीगृहाचा वापर करता येत नाही. तसेच एक खोली लोकप्रतिनिधींच्या वाहन चालकाने स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे. याबाबत ही विचारणा केली असता त्यावरही त्यांना उत्तर देणे जमले नाही. कामावर वेळेवर न आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाईल. यावर त्यांनी जे कर्मचारी वेळेवर आले नाही त्यांना कारणेदाखवा नोटीस दिली जाईल, असे सांगितले. तसेच भविष्यात बायोमॅट्रीक हजेरीची सुरुवात केली जाईल असे ही सांगितले. एकंदरीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयामध्ये वरीष्ठांचा धाक कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नसल्याचे वास्तव समोर आले.






