डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज
| अलिबाग | प्रतिनिधी |
नागोठणे परिसरातील अल्पवयीन मुलीचा मृत्यू टॉयफाईडमध्ये झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याची माहिती नागोठणे पोलिसांकडून मिळाली आहे. तिचा व्हिसेरा मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच तिचा नक्की कशामुळे मृत्यू झाला हे कळणार आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे गुढ अद्यापही कायमच असल्याचे समोर येत आहे. याबाबत दै. कृषीवलमध्ये 28 एप्रिलच्या अंकात ‘डॉक्टर, मुलगी कुठेय’अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
नागोठणे येथील नडवली आदीवासीवाडीमधील तेरा वर्षाची मुलगी बुधवार (दि.26) रोजी घरात चहा बनवित असताना, अचानक चक्कर येऊन खाली पडली. तिला बेशुध्द अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुगाणालयात सायंकाळच्या सुमारास आणले. परंतू कित्तेक तास उलटूनही तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात रुग्ण प्रशासन उदासीन ठरले होते. रुग्ण प्रशासनाच्या या कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र कृषीवलच्या दणक्याने गुरुवारी सायंकाळी तिच्या मृतेदहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
अल्पवयीन मुलीचा मृत्यू होऊन अनेक दिवस उलटून गेली आहेत. तरीदेखील तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. अखेर ती मुलगी टॉयफाईडमुळे मृत पावल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असल्याची माहिती नागोठणे पोलिसांनी दिली. मात्र अद्यापही मृत्यूचे स्पष्ट कारण गुलदस्त्यातच राहिल्याचे चित्र आहे. पोलिसांनी या मृत मुलीचे व्हिसेरा मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत. या प्रयोगशाळेतून येणाऱ्या अहवालानंतरच मृत्यू नक्की कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे.