| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नैना हटाव, शेतकरी बचाव,जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी आरोळ्या ठोकत,राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी सिडकोच्या नैना प्रकल्पा विरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.3) पनवेल ते मंत्रालय अशी पदयात्रा सुरु केली आहे. आज आंदोलक चेंबूर-सायन परिसरात वास्तव्य करणार असून हा मोर्चा उद्या (दि.4) मंत्रालयावर धडकणार आहे.
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला होता. जाहिर केलेल्या निर्णयानुसार गुरुवारी पनवेल येथून आंदोलक ग्रामस्थांनी मंत्रालयाकडे कूच केली असून, पायी निघालेल्या आंदोलनात हजारो ग्रामस्थ भर पावसात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नैना हटाव, शेतकरी बचाव अशा प्रकारची घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र जमले. छत्रपती शिवरायांना अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून दहा वाजता या मोर्चाला सुरवात करण्यात आली त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी दिंडीमध्ये सहभागी झाले. यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने शेतकरी,नागरिक, ग्रामस्थ या मोर्चा त सहभागी झाले. नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या नैनाला आमचा विरोध आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पनवेलमधून मोर्चा निघाला.
पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या अन्यायकारक नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकाप आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पनवेल ते आझाद मैदान, मुंबई पायी दिंडीला प्रारंभ करण्यात आला. या पायी मोर्चात शेतकरी बांधवांसमवेत नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेकाप, महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष, नैना विरोधी इतर सर्व सामाजिक संघटना व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.
या दिंडीमध्ये माजी आ.बाळाराम पाटील, पंडित पाटील, मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष.जे.एम.म्हात्रे, शिवसेना नेते बबन पाटील, सभापती नारायण घरत, काँग्रेस नेते आर.सी. घरत, महेंद्र घरत, शिवसेना नेते शिरीष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, कामगार नेते सुरेश ठाकूर, अन्य नेते, माजी.नगरसेवक, शेतकरी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भजन कीर्तनाचा गजर
या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी परिवाराचे नागरिक सामील झाले आहेत.टाळ-मृदूंगाच्या गजरात भजन कीर्तनाच्या माध्यमातून ही वारकरी मंडळी नैना प्रकल्पाला विरोध दर्शवत असल्याने मोर्चाला वारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.