‘या’ मंत्र्याच्या बंगल्याला ‘किल्ले रायगड’ नाव

मंत्र्यांच्या बंगल्यांना देणार गड-किल्ल्यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्ल्यांच नावं देण्यात येणार आहे. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावं मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या -6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी ’किल्ले रायगड’ असं नाव देण्यात आले आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या इ2 बंगल्याला ’रत्नसिंधु’ असं नाव देण्यात आले आहे.

गेले कित्येक दिवस मंत्रालयांच्या समोरचे बंगले आणि त्यांचे नावं ही गडकिल्यांची असावी यासाठी शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी प्रयत्न करत होते. याच पार्श्‍वभूमीवर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. मला सांगताना आनंद होतोय की, आजपासून सर्व मंत्र्यांची बंगले ही गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखली जातील. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नावं बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. शिवप्रेमींची मागणी मान्य झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करतो, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

मुंख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं काय?
राज्य सरकारने मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड आणि किल्यांचे नाव देण्याचं ठरविल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ’वर्षा’ बंगल्याचंही नाव बदलणार का? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांतर केलेल्या बंगल्यांमध्ये मलबार हिल परिसरात असणार्‍या बंगल्यांचा समावेश नाही. मलबार हिलच्या बंगल्यांबाबत कदाचित विचार केला जाण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचं नामांतरण करण्यात आलं आहे.

Exit mobile version