चौलमळा गावाच्या नामफलकाचे अनावरण

गावप्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते लोकार्पण

| चौल | प्रतिनिधी |

आजकाल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावेच्या गावे उद्ध्वस्त केली जात आहेत. आणि, हे सर्व पाहता माझा गाव माझा अभिमान ही संकल्पना उराशी बाळगत ‌‘माझे गाव चौलमळा’ या नावाच्या नवीन नामफलकाचे अनावरण नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत सोमवारी, (दि. 22) आई कृष्णादेवीच्या साक्षीने गावचे प्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते पालखी मिरवणुकी दरम्यान करण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावाचा नामफलक जीर्ण झाला होता. तसेच चौलमळा गावापासून वरंडे गाव जवळपास तीन ते चार किलोमीटर आत आहे. परंतु, तरीसुद्धा चौलमळा गावाच्या ठिकाणी ‌‘वरंडे फाटा’ असे नामफलक मागील काही वर्षांपासून होते. त्यामुळे चौलमळा गावाचे नाव कुठेतरी मागे पडत असल्याची जाणीव गावप्रमुख रवींद्र घरत यांच्यासह सर्व ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे यापुढे गावाच्या मुख्य ठिकाणी आपल्या गावाच्या नावाचा ठळक अक्षरातील नामफलक असावा, ही संकल्पना रवींद्र घरत यांनी ग्रामस्थांना बोलून दाखविली. ग्रामस्थांनीसुद्धा तात्काळ गावाचा नामफलक बनवून घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार सोमवारी, (दि. 22) आई कृष्णादेवीच्या पालखी मिरवणुकीदरम्यान शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि आई कृष्णादेवीच्या साक्षीने गावप्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून नामफलकाचे अनावरण झाले.

यावेळी गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, खजिनदार अल्पेश घरत, सहसचिव शरद नाईक, कार्यकारी मंडळातील सदस्य रवींद्र नाईक, सचिन गोंधळी, प्रशांत आमरे, महेश पाटील, डॉ. प्रितेश म्हात्रे, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष तथा भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश घरत, राजेंद्र घरत, शैलेश नाईक, बाळकृष्ण पाटील, अंजेश घरत, राजेंद्र नाईक, जितेंद्र घरत यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, युवक मंडळाचे सभासद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझे गाव माझा अभिमान असून, ग्रामस्थांनी नेहमीच एकीतून आपले अस्तित्व आजूबाजूच्या गावांना दाखवून दिले आहे. गावाची आणि गावातील युवक आणि ग्रामस्थांची एकी पाहून आज ‌‘माझे गाव चौलमळा’ या नामफलकाचे अनावरण करताना समाधान वाटत असल्याचे रवींद्र घरत यांनी सांगितले.

Exit mobile version