नवी मुंबईतील बालकलाकारांसह सात चित्रकार मुरूडमध्ये दाखल
| आगरदांडा | प्रतिनिधी |
निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरूड शहरातील विविध नयनरम्य स्थळांचे चित्र कॅनव्हासवर साकारण्यासाठी नवी मुंबई येथील अर्बन स्केचर्स ग्रुपमधील बालकलाकारासह सात चित्रकार मुरूडमध्ये दाखल झाले आहेत. मुरूडची संस्कृती, जुनी कौलारू घरे, लोकवस्ती आणि निसर्गरम्य परिसर यांचे थेट निरीक्षण करून ते आपल्या कलेतून चित्ररूप देत आहेत. या उपक्रमात मुंबई महापालिकेचे कला शिक्षक अमोल पवार, व्यावसायिक चित्रकार निशिकांत पलांडे, नवी मुंबईतील काळसेकर कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक यतीश चव्हाण, पार्वती चव्हाण तसेच बालकलाकार गीत चव्हाण सहभागी झाले आहेत.
मुरूडच्या निसर्गसौंदर्याचे चित्रण करण्यासाठी आलेल्या या कलाकारांचे स्थानिक हौशी कलाकार जैनेद्र सिंह आणि शशिकांत कोलवणकर यांनी स्वागत केले. यावेळी जैनेद्र सिंह यांनी कलाकारांना मुरूडमधील विविध निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती देत कॅनव्हासवर चित्रणासाठी योग्य ठिकाणे सुचवली.
यावेळी बोलताना कला शिक्षक अमोल पवार म्हणाले की, मुरूडला निसर्गाने अतिशय सुंदर रूप दिले आहे. शहरातील कोणत्याही कोपऱ्यात उभे राहिले तरी हिरवाईने नटलेला परिसर, समुद्रकिनाऱ्याजवळील जेट्टीवरील बोटी, कोळीवाडा, नवाबी काळातील राजवाडे, नारळ-सुपारीच्या बागा, कौलारू घरे आणि स्वच्छ, विस्तीर्ण समुद्रकिनारा अशी विविध दृश्ये पाहायला मिळतात. ग्रामीण जीवन आणि निसर्गाची ही विविधता प्रत्यक्ष कॅनव्हासवर उतरवण्याची संधी येथे कलाकारांना मिळत आहे.
