। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची ख्याती सर्वदूर आहे. अनेक चित्रकार निसर्गचित्र काढण्यासाठी माथेरानला येऊन राहतात. पर्यटकांना आणि चित्रकारांना आपल्याकडे खेचून घेणारा हा निसर्ग चित्रकार कॅनव्हासवर उतरवणार आहेत. 4 आणि 5 एप्रिल रोजी माथेरानमध्ये चित्रकारांची कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यानिमित्ताने माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर अवतरणार आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख तथा पालिकेचे माजी बांधकाम सभापती तसेच दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून, येथे येणार्या स्पर्धकांची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या चित्रकारांनी सहभाग नोंदविला आहे. 5 एप्रिलला मुंबई येथील चित्रकार वैभव नाईक यांच्याहस्ते प्रात्यक्षिक होणार आहे. तर, चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे परीक्षण नामांकित चित्रकार वैभव नाईक तसेच पुणे येथील चित्रकार अमित ढाणे करणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 6 एप्रिल रोजी होणार असून, प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व मानपत्राने सन्मानित केले जाणार आहे.
कलेची रुची वाढावी
कोरोना महामारीनंतर आलेला मानसिक तणाव दूर करण्यासाठी तसेच विद्यार्थी व तरुणांमध्ये कलेची रुची वाढावी यासाठी ही चित्रकला स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस आहे. स्पर्धकांची सोय निःशुल्क करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे माथेरानची ख्याती सर्वदूर पसरेल, तसेच येथे आलेल्या स्पर्धकांमुळे येथील लोकांचा व्यवसायही बहरेल, असा विश्वास शिवसनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला आहे.