उरणचा निसर्ग वणव्यांमुळे धोक्यात

| उरण | वार्ताहर |

उरण शहर परिसरात तसेच ग्रामीण पट्ट्यातील जंगलात मानवनिर्मित वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वशेणी-सारडे परिसरातील डोंगरावर सोमवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या वेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांना वणवा विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. त्यामुळे दिवसागणिक जंगलाला लागणारे वणवे चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे ज्या समाजकंटकांच्या माध्यमातून हे वणवे लावले जात आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

औद्योगिकीकरणामुळे उरण परिसरातील जैवविविधता कमी झाली आहे, पण मानवनिर्मित वणव्यांचे ग्रहण उरण परिसरातील जंगलाला लागले आहे. यामुळे जंगलातील प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव, झाडे आगीत होरपळत आहेत. महिनाभरापासून अनेक वेळा डोंगर वणव्यामध्ये बेचिराख होत आहेत. त्यात नैसर्गिक वणवा लागण्याची शक्यता 10 टक्के, मानवनिर्मित वणवे लागण्याची शक्यता 90 टक्के असल्याने वनसंपदा धोक्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

चुकीच्या समजुतींमुळे खतपाणी
मध गोळा करणारे आगीची टेंभेरूपी बत्ती घेऊन जातात. मध काढल्यावर जंगलात फेकतात. तसेच गवत पेटवले तर चांगले गवत येत असल्याचा गैरसमज गुराख्यांमध्ये आहे. त्यामुळे गवत पेटवून देतात. जंगलात लागलेले वणवे झाडांचा बळी घेतात. नवीन बीज नष्ट करतात. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतादेखील कमी करतात. पाण्याचे प्रवाह दूषित करतात. निसर्गाची, वन्यजीवांची हानी होते. अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत.
Exit mobile version