चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन
| अलिबाग | प्रतिनिधी |
महिलांनी सक्षम राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. पक्षाच्या माध्यमातून मी होणार स्वावलंबी या कार्यक्रमाद्वारे महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व गुणगौरव सोहळा अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे रविवारी (27 ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी अलिबाग तालुका शेकाप महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, मुळेच्या सरपंच रोहिणी पाटील, पेझारी सरपंच प्राजक्ता पाटील,चेंढरे सरपंच स्वाती पाटील, रविंद्र म्हात्रे, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव, सदस्य सुमित माने, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सुषमा पाटील, संजना कीर, वृषाली पाटील, प्रिया वेलणकर, निनाद वारगे, अवधूत पाटील आदी मान्यवरांसह अलिबाग तालुक्यातील शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, प्रशिक्षणार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी महिलांना शिक्षण घेण्याची संधी नव्हती. त्यांना घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रवाहाच्या विरोधात जाऊन महिलांना शिक्षणाचा हक्क दिला. शिक्षणामुळे एक वेगळे परिवर्तन झाले. शेतकरी कामगार पक्ष याच विचारधारेतून तयार झालेला पक्ष आहे. महिला स्वावलंबी बनल्या पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे.
चित्रलेखा पाटील ,शेकाप नेत्या
यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी महिला म्हणून समाजात, राजकारणात स्वतःची वेगळी ओळख केली आहे. विधानसभेत एक वेगळा दबदबा त्यांचा राहिला आहे. त्यांनी पक्षाची आन, बाण व शान राखली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महिलांनी काम केले पाहिजे,अश अपेक्षाही त्यानी यावेळी व्यक्त केली. शेकाप हा कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब तसेच महिलांचा पक्ष आहे. गावे,वाड्यांमध्ये राहणार्या मुली शिकल्या पाहिजे ही भूमिका ठेवून 25 हजार मुलींसाठी सायकली वितरीत करण्यात आल्या आहेत. मुलींच्या स्वरक्षणासाठी स्वसंरक्षणाचेे धडे दिले. त्याचाच एक भाग म्हणून गावांतील महिलांना रोजगाराचे साधन खुले व्हावे यासाठी ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आज अनेक मुली, महिला हे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत काही महिलांना स्वयंपाकाची भांडी वाटप करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली तसेच झेरॉक्स मशिन देण्यात आली असल्याचे त्या म्हणाला. महिला शिकल्या पाहिजे, महिलांचा राजकिय, सामाजिक व आर्थिक विकास झाला पाहिजे या दृष्टीने शेकापच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवित आहोत. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे.अशी अपेक्षाही चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली.
सध्या डिजीटलचे युग आहे. सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या लहान मोठ्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी या सोशल मिडीयाचा वापर करणे गरजेचे आहे. अलिबागची एक वेगळी ओळख यातून निर्माण व्हावी हीच एक इच्छा आहे. महिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते. त्यावेळी तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे कायमच प्रत्येकाने लक्षात ठेवून प्रत्येक महिलेने स्वावलंबी बनले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या पाहिजे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
महिलांचा सन्मान
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मुली, महिलांसाठी ब्युटी पार्लरचा कोर्स घेतला होता. हा कोर्स पुर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र व पार्लरचे कीट वितरीत करण्यात आले. तसेच पुन्हा नव्याने ब्युटी पार्लरच्या कोर्सचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये सहभाग घेतलेल्या 12 महिलांचा सत्कार करण्यात आला. डिजीटल मार्केटींगचे प्रशिक्षण पुर्ण झालेल्या 16 महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
गावांतील महिला बचत गटांना रोजगाराचे दालन खुले व्हावे यासाठी नवेदर बेली व घसवड येथील महिलांसाठी स्वयंपाक भांडी वाटप करण्यात आली. वाघोडे येथील चंदरवाडी येथील जागृती नाईक या आदिवासी मुलीला व्यवसाय सुरु करण्यासाठी झेरॉक्स मशीन देण्यात आली. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.