संस्था उभी करून ती सक्षम बनविणे ही काळाची गरज – चेअरमन आ.जयंत पाटील यांचे प्रतिपादन

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
सभासदांना 12.50 टक्के लाभांश जाहीर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

सहकारी संस्थाना अधिक सक्षम बनविण्यासाठी रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यप्रणाली प्रमाणे एकत्रित काम करण्याचे आवाहन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील यांनी बुधवारी ( 7 सप्टेंबर) अलिबाग येथे केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी आ.पाटील बोलत होते.यावेळी सभासदांना 12.50 टक्के लाभांश सलग दुस-या वर्षी जाहीर करण्यात आला.

यावेळी व्हाईस चेअरमन सुरेश खैरे,प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, जेष्ठ सभासद शंकरराव म्हात्रे, बँकेचे सर्व विद्यमान संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेतील अधिकारी वर्ग , कर्मचारी वर्ग आणि सभासद, भागधारक उपस्थित होते.
बँकेने सन 2021-22 या वर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करीत रु.36.94 कोटी इतका ढोबळ नफा मिळविलेला असून रु.23.72 कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. सहकारातून सहकार वाढवणे हे आपले अंतिम ध्येय असले पाहिजे त्यामुळे सर्व सहकारी संस्थांनी एकत्रित ध्येय धोरणाने काम करणे आवश्यक आहे ,असे त्यानी यावेळी सुचित केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकने सातत्यपूर्ण कामगिरी करत ऑगस्ट 2022 पर्यंत रु.4000 कोटींचा व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे, या आर्थिक वर्षात हा टप्पा रु.4500 कोटींच्या पुढे असेल तसेच बँकेने रु.500 कोटींचा स्वनिधीचा टप्पा पार केला आहे, बँकेच्या दृष्टीकोनातून हा अतिशय महत्वाचा टप्पा असून यापुढील काळातील बदलणारे बँकिंग लक्षात घेता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या धोरणांमध्ये अधिक परिणामकारकता आणि आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करून त्यात नक्कीच यशस्वी होईल अस पाटील यांनी सभासदांना आश्‍वासित केले.

बँक या आर्थिक वर्षामध्ये युपीआय तसेच क्यूआर कोडची सेवा सुरु करणार असून यामुळे बँकेच्या असंख्य ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. शिवाय बँकेच्या माध्यमातून बचतगटांचे फेडरेशन अधिक सक्षम करून वि.का.सह. संस्थांकरिता गोडाऊन उभारणी करिता एकत्रित स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात येणार असून बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्यावर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कार्यकारी सहकारी संस्थाना त्यांचा व्यवसाय आणि नफा वाढविण्यास मदत होणार असून त्यामुळे त्या अधिक आर्थिक सक्षम बनतील असे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले.

देशभरात बँकेचा लौकिक
एखाद्या संस्थेवर टीका करणे सोपे असते परंतु एखादी संस्था उभी करणे, ती टिकविणे आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्य राखणे हे अधिक अवघड काम असते, आपल्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेचे सर्व संचालक तसेच ज्यांच्या काळात बँक स्थापन झाली ते माजी अध्यक्ष व संचालक, कर्मचारी यांचे देखील त्यांनी आभार मानले. बँकेच्या 61 वर्षाच्या कालावधीत बँकेने जोडलेले ग्राहक, राज्यात आणि देशामध्ये निर्माण केलेले नाव यामुळे आज जिल्ह्यातील अभिमानास्पद बँक म्हणून रायगड जिल्हा सहकारी बँकेकडे देशभरातून पाहिले जाते याबाबत सर्वांचे अभिनंदन केले.

सहकार क्षेत्र पूर्णपणे आधुनिक जगताशी जोडले जाणार असून त्यामुळे ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, शिकण्याची ताकद आहे अशा तरुणांनी सहकार क्षेत्रामध्ये येणे आणि सहकार क्षेत्राला मजबूत बनविणे ही काळाची गरज आहे , तरच सहकार क्षेत्रामधील संस्था अधिक वेगाने प्रगती करू शकतील असे प्रतिपादन त्यांनी केले.


1)बँकेचा स्वनिधी 700 कोटीपर्यंत नेणार .
2)क्यू-आर कोड, युपीआय ही सेवा कार्यान्वित
3) वि.का.सह.संस्थांकरिता गोडाऊन उभारणी करिता स्वतंत्र कार्यालय स्थापन करणार
4)गृहकर्जाची मर्यादा 60 लाख
5)वि.का.सह.संस्थांचे 50 गोडाऊनचे जाळे निर्माण करणार.
6) छोट्या व्यावसायिकांना तात्काळ 5 लाखाची कर्ज सुविधा
7)सहकार क्षेत्रात तरुणांनी येणे गरजेचे.
— आ.जयंत पाटील ,चेअरमन


1) 4500 कोटींचा व्यवसाय पूर्ण करणार.
2)तंत्रज्ञानस्नेही बँक म्हणून प्रगती करणार.
3) 17% पेक्षा अधिक सीआरएआर
4) ऑडीट मध्ये सातत्याने ङ्गअफ वर्ग
5) नाबार्ड तपासणीमध्ये सर्वाधिक गुण
6)ग्राहक सेवेवर विशेष प्राधान्य.
— मंदार वर्तक, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी)

यावेळी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या कामगिरीबाबत उपस्थितांना माहिती देताना बँकेने 31 मार्च 2022 अखेर रु.3846 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करताना रु.2464 कोटींच्या ठेवी रु.1382 कोटींचे कर्जवाटप केले असल्याचे सांगितले. तसेच आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत वैधानिक लेखापरीक्षणामध्ये अ ऑडीट वर्ग मिळविलेला आहे याबाबत आनंद व्यक्त केला. बँक 2022-23 या आर्थिक वर्षात रु.4500 कोटींचा व्यवसाय टप्पा नक्कीच पूर्ण करेल तसेच अधिक गतिमान आणि तत्पर सेवेकरिता बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तंत्रज्ञानस्नेही बनविण्यास कटीबद्ध राहणार असे मंदार वर्तक यांनी सांगितले.

सभेमध्ये कोरोनाकाळात तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक, बँकेचे माजी संचालक श्रीपत केरू धोकटे, मोतीराम चाया पाटील, बँकेचे कर्मचारी प्रकाश घाग, उमेश खेडेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शाखाधिकारी म्हणून शिताफीने आणि कर्तव्यदक्ष राहून पोयनाड एटीएम सेंटर मधील चोरांना पकडून देणा-या शाखाधिकारी राजेंद्र पाटील यांचा सन्मान बँकेच्या अध्यक्षांच्या वतीने करण्यात आला. यावेळी बँकेच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून प्रभावी कामगिरी करणा-या शाखा आणि शाखाधिकारी अनुक्रमे पनवेल, बिरवाडी, निजामपूर, कळंबोली,पेण शहर, नेरळ यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 126 विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून विशेष कार्य करणा-या मसद वि.का.से.सह.संस्था-पेण, बेलोशी वि.का.से.सह संस्था-अलिबाग, पाली उपग्राम वि.का.से.सह संस्था-पाली, पोलादपूर वि.का.से.सह संस्था-पोलादपूर, सायगाव वि.का.से.सह संस्था-श्रीवर्धन, म्हसळा वि.का.से.सह संस्था-म्हसळा, खार आंबोली वि.का.से.सह संस्था-मुरुड यांचे अभिनंदन बँकेच्या वतीने करण्यात आले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. संदीप जगे यांनी आभार मानले.

Exit mobile version