| पालघर | प्रतिनिधी |
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर एक लाख 43 हजार 552 मतदार वाढले आहेत. नालासोपारा आणि बोईसर विधानसभा क्षेत्रातील मतदारांची सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. 17 ते 19 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये 26 हजार मतदारांची वाढ झाली. जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात आता एकूण 22 लाख 92 हजार 66 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवीन मतदार निर्णायक ठरणार असून, बाजी पलटवणार अशी चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून होताना दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यात 11 लाख 87 हजार 589 पुरुष, तर 11 लाख चार हजार महिला आणि 231 तृतीयपंथी मतदार आहेत. नालासोपारा मतदारसंघामध्ये सर्वाधिक सहा लाख आठ हजार 526 मतदार आहेत. त्या खालोखाल बोईसर मतदारसंघात चार लाख 11 हजार 329 मतदार आहेत. वसई मतदारसंघात तीन लाख 54 हजार 652 मतदार, विक्रमगड मतदारसंघात तीन लाख 17 हजार 741, डहाणूमध्ये तीन लाख एक हजार 239, तर पालघर मतदारसंघात दोन लाख 98 हजार 579 मतदार 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीनंतर नालासोपारा मतदारसंघात 51 हजार मतदारांची वाढ झाली, तर बोईसरमध्ये 27 हजार, डहाणूमध्ये 18 हजार, विक्रमगड, पालघर आणि वसई या मतदारसंघात प्रत्येकी सुमारे 16 हजार मतदार वाढलेले दिसून येत आहेत. या सर्व मतदारसंघात मतदारसंख्या तीन ते साडेतीन हजारांनी वाढल्याचे दिसून आले. नालासोपारा मतदारसंघात नऊ हजार 907 मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. 46 हजार नवमतदारांची नोंद झाली असून, नोंदवलेल्या मतदारांपैकी 17 हजार 432 जण अपंग असून त्यांना आवश्यक वाटल्यास कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना घरी मतदान करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. त्याचप्रमाणे सैन्यामध्ये कार्यरत असणारे 326 मतदार असून, विक्रमगडमध्ये 121, तर नालासोपार्यामध्ये 83 जणांचा समावेश आहे.