पुढील पाच दिवस धोक्याचे; हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले

। अलिबाग । प्रतिनिधी ।

हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनूसार पुढील पाच दिवस रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याची पाण्याची पातळी 86.10 मी आहे. पुढील धोका टाळण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे 0.3 मीटरने उघडण्यात उघडले असून सांडव्यावरुन वाहणारा विसर्ग 177.7 घ.मी. प्रतिसेकंद इतका आहे.

या पार्श्‍वभूमीवर गावातील नागरिकांना धरण परिसरात न जाण्याचे आवाहन तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी केले आहे. तसेच महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

पेण तालुक्यातील कामार्ली येथे हेटवणे मध्यम प्रकल्प आहे. या धरणाच्या पाण्याची पातळी 86.10 मी. असून धरण 100 टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात असाच मुसळधार पाऊस पडल्यास धरणाचे दरवाजे उघण्यात येणार आहेत. परिसरातील सर्व पंचायतींना आणि भोगश्‍वरी नदीकाठच्या ग्रामस्थांना याबाबत कळविण्यात आले आहे.

Exit mobile version