रायगडात ऑरेंज अलर्ट
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा इशारा
| पुणे | प्रतिनिधी |
जवळपास तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर रायगडसह संपूर्ण राज्यभर पुन्हा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. रायगडसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. रविवारी दिवसभर रायगडातील सर्वच तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरु होती. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रविवारी सकाळपासूनच जोर धरला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रविवारपासून पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
अरबी समुद्रातील वाहणार्या वार्यामुळे राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र अद्याप अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद झालं आहे. पावसाअभावी अनेक शेतकर्यांची पिकं जळून गेली आहे.
अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, किनारपट्टीच्या भागात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याठिकांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ आणि जालना या जिल्ह्यानं हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर, घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात अंशतः कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं विदर्भातही बहुतांशी ठिकाणी ढगांचा गडगडाट होणार आहे.