मोकाट गुरांचा उपद्रव वाढला

नागरिकांसह भाविकही हैराण; बंदोबस्त करण्याची मागणी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे प्रमुख व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट गुरांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांसह येणारे भाविक देखील हैराण झाले आहेत. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालीकर करत आहे. पालीत माकड़े, भटकी कुत्री व आता मोकाट गुरांची नागरिकांना डोकेदुःखी ठरत आहे.

अपघातात गुरे मृत्युमुखी देखील पड़त आहेत. ही गुरे पाली बाजारपेठ, बल्लाळेश्‍वर मंदिर परिसर, पोलीस स्थानक, तहसील कार्यालय अशा विविध ठिकाणी झुंडीने फिरत असतात. त्यामुळे त्यांची दहशत निर्माण झाली आहे. रस्त्यावर व रहिवाशी ठिकाणी मलमूत्र टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न देखील निर्माण झाला आहे. परिणामी या मोकाट गुरांच्या बाबत योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. आता पाली नगरपंचायत कार्यकारणी यावर कोणती भूमिका घेणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यावर परिणाम
शेतकरी किंवा गुरेपालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. बर्‍याच वेळा ही मोकाट गुरे गाव व शहराच्या उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर व रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक पिशवीत टाकलेले अन्न पदार्थ पिशवीसह खातात. परिणामी बहुतांश गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लस्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. त्यामूळे गुरे मरतात देखिल. गुरे मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करून गोठ्यात ठेऊन द्यावीत. किंवा रानात सोडावीत. गावात आल्यावर या गुरांमुळे कोणता अपघात किंवा दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय.

वाहतूक कोंडीची समस्या
मंदिरे खुली झाल्याने सध्या अनेक भाविक पालीत दाखल होत आहेत. रस्त्यावर झुंडीने फिरणार्‍या गुरांमुळे वाहतूक कोंडी होतांना दिसत आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा येतोच पण त्याबरोबरच पादचार्‍यांना देखील मार्ग काढणे अवघड होतं आहे.

अपघातांना निमंत्रण
झुंडीने फिरत असलेल्या या गुरांची बर्‍याचवेळा भांडणे देखील होतात. त्यामुळे काही वेळा पादचारी व वाहनांचे अपघात होऊन दुर्घटना देखील झाल्या आहेत. महिला, वृद्ध व लहानग्यांना रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले आहे. वेळीच उपाययोजना नाही केली तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका देखील आहे.

Exit mobile version