। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्याच्या संख्येत वाढ झाली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात मागील दोन दिवसात घरफोडीच्या पाच घटनांची नोंद तक्ररदार यांनी केली आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे मागील दोन दिवसात पाच घरफोड्या यांची नोंद करण्यात आली असून त्यात दोन घरफोड्या या कल्याण राज्यमार्गाच्या पलिकडे असलेल्या मोडकनगर येथील तर एक बाजारपेठ भागातील तसेच एक नेरळ पूर्व भागातील असून एक ममदापुरच्या नवीन वसाहत भागातील आहे.
त्यात मोडकनगर येथील मधू अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत 4400 रुपयांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. तर त्याच भागातील श्री समर्थकृपा अपार्टमेन्ट मधील एका घरातून 25600 रूपयांचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नेरळ टेपआळी भागातील दत्तकृपा रेसिडेन्सी मधील घरातून 32900 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. ममदापुर भागातील नवीन वसाहती मधील डंकन अपार्टमेंट मधील बंद घरातून 63000 रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. त्याचवेळी नेरळ पूर्व भागातील गंगानगर भागातील मातोश्री बंगला येथील घरातून 9000 रुपयांची रोकड पर्स मधून काढून चोरट्यांनी पोबारा केला आहे.